मेदू वडा


मेदू वडा हा माझा आवडता पदार्थ. घरात संध्याकाळी यायचे पाहुणे दुपारी कळले तर बनवायला एकदम उत्तम.

मेदू वडा
साहित्य
२ वाटी उडीद डाळ
२ हिरव्या मिरच्या
४ खोबऱ्याचे तुकडे
१ कांदा
मीठ

कृती
  • डाळ धुवून ५-६ तास पाण्यात भिजवून ठेवणे.
  • जास्तीचे पाणी ओतून डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटणे.
  • त्यात मीठ, बारीक चिरलेल्या मिरच्या, कांदा आणि खोबरे घालुन एकत्र करणे.
  • कढईत तेल गरम करून वडे मंद आचेवर भाजणे.

टीप
डाळ वाटल्याबरोबर लगेच वडे तळणे नाहीतर ते फार तेलकट होतात
वडे तेलात घातल्यावर ते तरंगायला पाहिजेत नाहीतर पिठात थोडे पाणी घालुन हलके करणे.
ह्यात आले पण घालता येते पण मला वाड्यात ते फारसे आवडत नसल्यानी मी वापरले नाही

मटण बिर्याणी


बरेच दिवसांपासून अजॉय ह्याची मागणी करत होता पण मला मटण फारसे आवडत नसल्यानी मी इतके दिवस बनवण्याचे टाळत होते. शेवटी आज मी हि बिर्याणी बनवली आणि एकदम छान पण झालेली

मटण बिर्याणी
साहित्य
३ वाटी तांदूळ
१/२ किलो मटण
७ कांदे
२ टोमाटो
२ बटाटे
१/२ वाटी दही
१/४ वाटी दुध
मुठभर काजू
५ बदाम
१ आले
१०-१५ लसूण पाकळ्या
१ चमचा गरम मसाला
२ चमचा तिखट
चिमुटभर हळद
१ चमचा धने पूड
१ चमचा खसखस
१.५ चमचा मिरे पूड
१/२ चमचा जिरे
१ चमचा बडीशेप
१ चमचा सुके खोबरे
८ लवंग
५ दालचिनी
२ तेजपत्ता
५-६ वेलची
चिमुटभर केशर
१/२ वाटी तूप
मीठ
तेल

कृती
  • आले आणि लसूण एकत्र बारीक वाटून घेणे.
  • मटण धुवून घेणे व त्याला दही, हळद, १ चमचा तिखट, निम्मी आले लसूण पेस्ट लावणे. ८ तास मुरण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • दुसऱ्यादिवशी तांदूळ धुवून घेणे व अर्धा तास कोमट पाण्यात भिजत ठेवणे. जास्तीचे पाणी ओतून देणे व बाजूला ठेवणे.
  • बटाटे उकडून घेणे व चकत्या बनवणे.
  • दुध गरम करणे व त्यात केशर विरघळवणे.
  • ३ कांदे बारीक बारीक चिरणे व बाजूला ठेवणे.
  • कढईत एक चमचा तेल गरम करणे व त्यात कांदा गुलाबी भाजणे व बाजूला ठेवणे.
  • त्याच तेलात अजून १ चमचा तेल घालुन त्यात जीरा, ३ दालचिनी, ५ लवंग, १ चमचा मिरे, धने, सुके खोबरे, बडीशेप, खसखस आणि उरलेले एक चमचा तिखट घालुन भाजणे.
  • मसाल्यांचा वास सुटला की त्यात भाजलेला कांदा घालणे व गुलाबी रंगावर भाजणे.
  • त्यात उरलेली आले लसूण पेस्ट घालणे व भाजणे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे
  • बदाम, काजू(८-१०) आणि वर भाजलेला मसाला थोडे पाणी घालुन एकत्र वाटणे.
  • उरलेले ४ कांदे बारीक उभा चिरून तुपात गुलाबी रंगावर तळणे.
  • उरलेले काजू भाजणे व बाजूला ठेवणे.
  • चमचाभर तूप बाजूला ठेवून उरलेले तूप गरम करणे. त्यात मसाला घालुन तूप सुटेपर्यंत भाजणे
  • त्यात मटणाचे तुकडे घालुन तूप सुटेपर्यंत शिजवणे.
  • टोमाटो मिक्सरमध्ये वाटून घेणे व शिजणाऱ्या मटणात घालणे.
  • त्यात १/४ वाटी पाणी आणि मीठ घालुन मिश्रणाला शिट्टी काढणे व नन्तर मंद आचेवर १० मिनिट शिजू देणे.
  • मटण शिजत असताना १० वाटी पाणी उकळवून त्यात मीठ घालणे व तांदूळ घालुन भात शिजवणे.
  • जास्तीचे पाणी ओतून भात थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • कढईत उरलेले तूप गरम करणे व त्यात ३ लवंग, २ दालचिनी, १/२ चमचा मिरे, ताज पत्ता, वेलची भाजणे व भातात मिसळणे.
  • शिजलेले मटण कढईत घालुन सुकेपर्यंत शिजवणे.
  • त्यातील बाजूला सुटलेले तूप वेगळे करणे.
  • कुकरला तुपाचा हात लावणे व खाली बटाट्याच्या चकत्या लावणे.
  • त्यावर भाताचा १/३ भाग पसरवणे. निम्मे मटण पसरवून त्यावर १/३ भाग काजू व कांदा पसरवणे.
  • त्यावर अजून १/३ भाग भात पसरवणे. उरलेले मटण घालुन त्यावर १/३ भाग कांदा व काजू पसरवणे.
  • उरलेला भात वर पसरवून त्यावर उरलेले काजू व कांदा घालणे.
  • परतण्याच्या मागच्या बाजूनी भातात आरपार भोके पाऊन त्यावर वेगळे केलेले तूप व केशराचे दुध घालणे.
  • कुकर बंद करून मंद आचेवर तवा ठेवून त्यावर १५ मिनिट गरम करणे.

टीप
वाढताना अख्खा थर बाहेर काढून वाढणे म्हणजे सगळ्या मसाल्यांची चव चांगली ताटलीत येईल.

पालकाच्या भजीची कढी


आम्ही अगदी लहान होतो तेंव्हापासून बाबा आईला त्यांच्या ऑफिसच्या कढीचे कौतुक सांगत आलेले बघितलंय. आई बिचारी नेहमी तशी (तिनी कधीही न खालेली) कढी बनवण्याचा प्रयत्न करायची पण यश बाबांच्या मते काही आले नाही :) त्यामुळे अर्थातच लहान असताना आम्ही आठवड्यातून दोनदा तरी हि कढी खायाचोच. ताकापेक्षा कढी बरी कारण खोकला नाही होणार त्यामुळे कढी कढी जास्तच वेळा. मी हि कढी बनवताना नेहमीच्या भजीऎवजी पालक वापरायचा ठरवला.

पालकाच्या भजीची कढी
साहित्य
३ वाटी पालक भजी
६ वाटी ताक
चिमुटभर हळद
१/४ चमचा म्हवरी
चिमुटभर हिंग
३ चमचा साखर
१ चमचा तूप
मीठ

कृती
  • ताकात साखर आणि मीठ घालुन चांगले विरघळवणे.
  • कढईत तूप गरम करून त्यात म्हवरीची फोडणी करणे
  • त्यात हिंग, हळद टाकून टाकत मिसळणे.
  • वाढताना कढीत भजी घालुन देणे.

टीप
कढीच्या फोडणीत कडीपत्ता पण घालता येईल पण मला तो फारसा आवडत नसल्यानी मी वापरला नाही.

पालकाची भजी


साधारण एक महिना झाला हा पदार्थ बनवून पण हैदराबादमधून निघायच्या घाई गडबडीत पोस्ट करायला वेळच नाही मिळाला. त्यामुळे आज जरा वेळ मिळालाय तर इथे ५ नवीन कृती देणार आहे.

पालकाची भजी
साहित्य
१ पालकाची गड्डी
१/२ वाटी बेसन
१/२ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
चिमुटभर जीरा पूड
१/२ चमचा धने पूड
मीठ
तेल

कृती
  • पालक धुवून बाजूला ठेवणे.
  • बेसन, तिखट, हळद, जीरा पूड, धने पूड आणि मीठ एकत्र करून पाणी घालुन भिजवणे
  • कढईत तेल गरम करून त्यातील एक चमचा तेल पिठात घालणे.
  • तेल चांगले गरम झाले की एका वेळी २ पालकाची पाने एकत्र पिठात बुडवून तेलात सोडणे व गुलाबी रंगावर भाजणे

टीप
मी पालकाची छोटी पाने वापरली त्यामुळे एकदम मस्त कुरकुरीत भजी झाली.
पिठात एकावेळी २ पाने भिजवल्यानी त्याची चव भाज्यात चांगली लागत होती.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP