हरबरा डाळ वडा आणि डोसा


आज काहीतरी वेगळे करून बघण्याचा माझा विचार होता. थोड्या आठवड्यांपूर्वी अशीच कुठलीतरी कृती वाचलेली आणि त्यांनीच प्रेरित होऊन मी हे वडे बनवले. संध्याकाळी त्याच पीठाचे डोसे बनवले आणि ते सुद्धा तितकेच चांगले झालेले.

हरबरा डाळ वडा
हरबरा डाळ वडा
हरबरा डाळ डोसा
हरबरा डाळ डोसा
साहित्य
२.५ वाटी हरबरा डाळ
४ चमचे हिरव्या मिरच्या
४ चमचे कोथिंबीर
४ चमचे पुदिना
४ लसूण पाकळ्या
मीठ
तेल

कृती
  • हरबरा डाळ रात्रभर भिजवून ठेवणे.
  • सकाळी मिक्सरमध्ये डाळ, मिरच्या, लसूण, कोथिंबीर, पुदिना आणि मीठ एकत्र बारीक वाटणे.
  • वड्यासाठी: गरम तेलात चमचाभर पीठ टाकून मध्यम आचेवर दोन्हीबाजुनी गुलाबी होईपर्यंत तळणे.
  • डोश्यासाठी: पिठात थोडे पाणी घालुन पातळ करणे व तेल लावलेल्या गरम तव्यावर ओतून पसरवणे. दोन्हीबाजुनी गुलाबी होईपर्यंत भाजणे.

टीप
वडे बनवायचे असल्यास डाळ वाटल्यावाटल्या लगेच तळणे नाहीतर वडे तेल जास्त शोषून घेतात, खर सांगायच झाल तर मी त्यामुळेच संध्याकाळी उरलेल्या पीठाचे डोसे बनवले.

केळ्याचे कोफ्ते


हि कृती माझ्या फूड नेटवर्कवरच्या अनेक कार्यक्रमाच्या बघण्याचा परिणाम म्हणायला हरकत नाही. आज असेच टीव्ही बघत असताना वाटले केळ्यांचे काहीतरी वेगळे बनवावे. कोफ्ते करावेसे वाटले आणि मग मी वास घेत घेत कुठचे मसाले घालायचे ठरवत गेले. मजा आली असा एकदमच हटके प्रयोग करायला.

केळ्याचे कोफ्ते
साहित्य
३ कच्ची केळी
१ वाटी काजू
१/४ चमचा मिरे पूड
१/४ चमचा मिरे
१/२ चमचा बडीशेप
१/४ चमचा खसखस
२ लसूण पाकळ्या
१/२ चमचा आले
१/२ चमचा साखर
१/४ चमचा तिखट
१ दांडी दालचिनी
२ वाटी दुध
१/४ कांदा
मीठ
तेल

कृती
  • केळी किसून त्यात बारीक चिरलेली लसूण, किसून आले, मिरे पूड, १/४ चमचा बडीशेप आणि मीठ घालुन मळणे.
  • मळलेल्या केळ्याचे छोटे छोटे गोळे करून तेलात सर्वात जोरात आचेवर गडद रंग येईपर्यंत तळून घेणे.
  • मिक्सरमध्ये काजू, मिरे, उरलेले १/४ चमचा बडीशेप, दालचिनी घालुन बारीक पूड होईपर्यंत वाटणे.
  • त्यात कांदा चिरून घालुन पुन्हा वाटणे.
  • एक वाटी दुध घालुन पेस्ट बनवणे.
  • चमचाभर तेल कढईत गरम करून त्यात वाटण, १ वाटी पाणी आणि १ वाटी दुध घालुन जाड होईपर्यंत मध्यम आचेवर ढवळत शिजवणे.
  • त्यात मीठ, साखर आणि कोफ्ते घालुन २ मिनिट अजून उकळवणे.

टीप
केळी वापराल्यानी कोफ्ते एकदम पटकन चांगले कुरकुरीत होतात आणि ते जास्त तेल पण शोषून घेत नाहीत
मी ह्यात ग्रेव्ही आणि कोफ्ते ह्यांना वेगवेगळी पण तरीसुद्धा एकत्र होणारी चव देण्याचा प्रयत्न केलाय

पनीर बर्गर


पनीरच काहीतरी वेगळ बनवायचा विचारात पहिल्यांदा पिझ्झा ठरलेला पण मग बाहेर जायचं असल्यानी तो बेत रद्द केला. शेवटी बर्गर बनवला.


साहित्य
८ बर्गरचे पाव
८ चीज स्लाईस
४०० ग्राम पनीर
१ वाटी मैदा
२ बटाटे
१ चमचा आले
३-४ लसूण पाकळ्या
३-४ हिरव्या मिरच्या
१ चमचा मिरे पूड
मुठभर कोथिंबीर
१ कांदा
१ टोमाटो
१ वाटी लेट्युस
मीठ
तेल

कृती
  • पनीरचे चौकोनी तुकडे करून तव्यावर थोडे तेल घालुन गुलाबी रंगावर भाजून घेणे.
  • कुकरमध्ये बटाटे उकडून घेणे.
  • आले, लसूण, हिरवी मिरची मिक्सर मध्ये बारीक वाटून घेणे
  • परातीत कुस्करलेले बटाटे, आले-लसूण-मिरचीचे वाटण, मिरे पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ एकत्र करणे.
  • त्यात पनीरचे तुकडे घालणे व मिश्रणाचे टिक्की बनवणे.
  • मैदा आणि पाणी एकत्र करून पातळ पीठ बनवणे. ह्या पिठात टिक्की बुडवून तेलात मध्यम आचेवर गुलाबी होईपर्यंत तळणे.
  • बर्गरच्या पावावर टोमाटो, कांदा आणि चीज यांचा तुकडे रचणे. त्यावर टिक्की आणि लेट्युस घालुन बर्गर बंद करणे व खायला देणे.

टीप
मी ह्यात मेयो किंवा टोमाटो सॉस न वापरता बाजूला दिला त्यामुळे इंडिअन मसालेदार चव तशीच राहिली

मेथी पुरी


थोड्या दिवसांआधी मला इंडिअन मार्केट मध्ये एकदम छान मेथी मिळाली. नेहमीच्या पराठ्या आणि भाजीऎवजी काहीतरी वेगळ करायचा म्हणून हि पुरी केली. पहिल्याच प्रयत्नात एकदम सुंदर आणि चविष्ठ झालेली हि पुरी इथे देत आहे.

मेथी पुरी
साहित्य
१ मेथी गड्डी
२ वाटी मैदा
१ वाटी गव्हाचे पीठ
२ हिरव्या मिरच्या
१ चमचा आले
४-५ लसूण पाकळ्या
मीठ
तेल

कृती
  • मेथी धुवून मिक्सरमध्ये घालणे.
  • त्यात लसूण, आले, मिरच्या आणि अर्धा वाटी पाणी घालुन एकदम बारीक वाटणे.
  • परातीत मिश्रण ओतून त्यात मैदा, गव्हाचे पीठ आणि मीठ घालुन चांगले मळणे.
  • पिठाच्या गोळ्याला २-३ थेंब तेल लावून झाकून भिजण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात छोट्या पुऱ्या लाटून तळणे. दोन्ही बाजू गुलाबी झाल्याकी बाहेर काढणे.

टीप
मेथीचे मिश्रण बारीक वाटणे फार गरजेचे आहे नाहीतर लसूण, आल्याचे तुकडे लाटताना मध्ये मध्ये येऊन पुऱ्या फाटतील व फुलणार नाहीत.
मला पीठ भिजवताना आजून पाणी वापरावे लागले नाही. पण जरुरी वाटल्यास अजून पाणी किंवा पीठ वापरून मळणे.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP