रसकदम


बरेच दिवस झाले रसकदम खाऊन. माझा आवडता गोड पदार्थ त्यामुळे आज मी बनवण्याचे ठरवले. कृती रुचिरा नावाच्या पुस्तकातल्या कृतीवरून प्रभावित आहे.

रसकदम
साहित्य
३.५ वाटी दुध
१ चमचा व्हिनेगर
१.५ वाटी साखर
१.५ वाटी पिठी साखर
४ वाटी खवा
चिमुटभर केशर
१ वाटी किसलेले पनीर

कृती
  • २ चमचे दुध गरम करून त्यात केशर घालणे
  • उरलेले दुध उकळवणे व त्यात एक चमचा पाण्यात व्हिनेगर मिसळून घालणे.
  • पनीर वरच्या बाजूला जमा होईल आणि पाणी वेगळे होईल. पाणी ओतून देवून पनीर थंड पाण्यात स्वच्छ धुवून घेणे.
  • पनीर पंच्यात गुंडाळून पाणी पिळून टाकणे.
  • पनीर चांगले मळून घेणे व त्याचे २५ छोट्या आकाराचे गोळे बनवणे.
  • ६ वाटी पाण्यात साखर घालुन कुकरमध्ये उकळवणे.
  • त्यात पनीरचे गोळे सोडून ५ मिनिट उकळवणे.
  • कुकरचे झाकड लावून अजून ५ मिनिट उकळवणे. (शिट्टी न लावता)
  • कुकर उघडून त्यात अर्धा वाटी पाणी घालुन अजून ५ मिनिट उकळवणे व गोळे थंड होऊ देणे. गोळे पाकातून बाजूला काढून ताटलीत पसरवणे.
  • नॉनस्टिक तव्यावर मध्यम आचेवर पनीर गुलाबीरंगावर परतून घेणे.
  • खवा, पिठी साखर, केशर दुध एकत्र करून मळणे.
  • पनीर थंड झाले असेल त्याला मिक्सर मध्ये वाटून पूड करणे व एका ताटलीत पसरवणे.
  • शिजवलेले गोळे खव्याच्या मिश्रणात घालुन बंद करणे व नंतर पनीरच्या पूड मध्ये घोळवणे.

टीप
पनीर भाजताना ते करपणार नाही ह्याची काळजी घेणे व सारखे हलवत भाजणे. पनीरचा कच्चा वास गेला पाहिजे
शिजवलेले गोळे रसगुल्यासाराखेच असतात फक्त आकारणी छोटे आणि पाकचे प्रमाण वेगळे असते.
खव्याच्या मिश्रणात नारिंगी किंवा गुलाबी रंग घालता येईल पण माझ्याकडे नसल्यानी मी वापरला नाही.

अंड्याचे तुकडे


काल मी उकडलेल्या अंड्यांचा थोडा वेगळा प्रयोग करून पहिला. नेहमीच्या अंड्याच्या भाजीपेक्षा थोडा वेगळा छान वाटला खायला.

अंड्याचे तुकडे
साहित्य
४ अंडी
१ कांदा
२ हिरव्या मिरच्या
१/४ चमचा तिखट
१/४ चमचा धने पूड
चिमुट भर मिरे पूड
चिमुटभर दालचिनी पूड
कोथिंबीर
मीठ
तेल

कृती
  • अंडी उलालावून त्याचे कवच काढणे. अंड्याचे तुकडे करणे व बाजूला ठेवणे
  • तव्यावर तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे तळणे.
  • त्यात कांदा घालुन गुलाबी रंगावर परतून घेणे.
  • त्यात मिरे पूड, धने पूड, दालचिनी पूड, अंड्यांचे तुकडे आणि मीठ घालुन ३-४ मिनिट परतणे.
  • वरून कोथिंबीर आणि तिखट घालुन खायला देणे.

टीप
मला ह्यात जास्त मसाले न वापरता थोडी वेगळी चव द्यायची होती त्यामुळे मी दालचिनी वापरली आणि एकदम अचूक निवड होती

कोळंबीचे पॅटिस


भारतात असताना मी एक दोनदा पॅटिस बनवण्याचा प्रयत्न केलेला. पण त्याला कधीच चांगले पापुद्रे आले नाहीत. बरेच किचकट आणि पसारा करणारे काम होते. त्यामुळे इथे मी बाजारातल्या पफ पेस्ट्री शिटचा वापर करण्याचे ठरवले. एकदम छान झालेले पण अजूनही मनातली शिटपण स्वतः बनवण्याची इच्छा गेली नाहीये.

कोळंबीचे पॅटिस
साहित्य
2 पफ पेस्ट्री शिट
१ वाटी कोळंबी
१ टोमाटो
२ कांदा
४ लसूण पाकळ्या
१ चमचा धने पूड
१ चमचा तिखट
१/४ चमचा गरम मसाला
१/४ चमचा जिरे पूड
१/२ चमचा मिरे पूड
चिमुटभर हळद
१ अंडे
मीठ
तेल

कृती
  • पफ पेस्ट्री शिट फ्रीजमधून काढून त्यांना नेहमीच्या तापमानावर आणावे.
  • त्या वेळात कढईत तेल गरम करून त्यात कांदा भाजून घेणे
  • त्यात बारीक चिरलेला टोमाटो घालणे आणि पूर्ण पणे शिजवणे.
  • त्यात कोळंबी आणि लसूण घालुन अजून २-३ मिनिट शिजवणे.
  • त्यात हळद, तिखट, गरम मसाला, जिरे पूड, मिरे पूड आणि मीठ घालणे व तेल बाजूला निघेपर्यंत भाजणे.
  • त्यात धने पूड घालुन अजून एक-दोन मिनिट शिजवणे व बाजूला ठेवणे.
  • ओव्हन २००C/४००F वर गरम करणे.
  • बेकिंग ट्रेला तुपाचा किंवा लोण्याचा हात लावणे.
  • प्रत्येत पेस्ट्री शिटला ३ उभ्या भागांत आणि २ आडव्या भागात कापून त्याचे १२ तुकडे करणे. प्रत्येक तुकड्यावर कोळंबीचे मिश्रण घालुन दुमडून बेकिंग ट्रेवर ठेवणे.
  • अंडे फेटून घेणे व एक टिशू त्यात बुडवून पफ वर फिरवणे.
  • ओव्हन मध्ये २००C/४००F वर १५ मिनिट भाजणे व गरम गरम खायला देणे.

टीप
मी मध्यम आकाराचे कोळंबी वापरलेली त्यामुळे मला त्याचे तुकडे करावे लागले नाहीत
अंड्याचा वापर केल्यानी वरून एकदम छान गुलाबी होतात.

खरबूजाची लस्सी


२ आठवड्यांपूर्वी मी एकदम वेगळा प्रयोग करून पहिला. फ्रीजमध्ये एक जुने खरबूज होते आणि दही होते त्यातून निर्माण झालेली हि कृती

खरबूजाची लस्सी
साहित्य
१ खरबूज
६ वाटी दही
५ चमचे साखर
एक थेंब व्हॅनिला इसेन्स
मीठ

कृती
  • खरबूज बारीक कापून घेणे
  • थोडे तुकडे वरून वापरण्यासाठी बाजूला ठेवणे व बाकीचे मिक्सरमध्ये वाटून घेणे.
  • ज्यूस गाळून घेणे आणि दह्यात मिसळणे.
  • त्यात साखर, मीठ, व्हॅनिला इसेन्स घालुन पुन्हा चांगले ढवळणे.
  • प्यायला देताना ग्लासमध्ये वरून खरबुजाचे तुकडे घालुन थंड करून देणे.

टीप
मी एकदम घट्ट दही वापरलेले आणि पाण्याचा बिलकुल वापर नाही केला कारण खाराबुजाचेच पाणी वापरल्यानी चव चांगली आली.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP