कोळंबीचे पॅटिस


भारतात असताना मी एक दोनदा पॅटिस बनवण्याचा प्रयत्न केलेला. पण त्याला कधीच चांगले पापुद्रे आले नाहीत. बरेच किचकट आणि पसारा करणारे काम होते. त्यामुळे इथे मी बाजारातल्या पफ पेस्ट्री शिटचा वापर करण्याचे ठरवले. एकदम छान झालेले पण अजूनही मनातली शिटपण स्वतः बनवण्याची इच्छा गेली नाहीये.

कोळंबीचे पॅटिस
साहित्य
2 पफ पेस्ट्री शिट
१ वाटी कोळंबी
१ टोमाटो
२ कांदा
४ लसूण पाकळ्या
१ चमचा धने पूड
१ चमचा तिखट
१/४ चमचा गरम मसाला
१/४ चमचा जिरे पूड
१/२ चमचा मिरे पूड
चिमुटभर हळद
१ अंडे
मीठ
तेल

कृती
  • पफ पेस्ट्री शिट फ्रीजमधून काढून त्यांना नेहमीच्या तापमानावर आणावे.
  • त्या वेळात कढईत तेल गरम करून त्यात कांदा भाजून घेणे
  • त्यात बारीक चिरलेला टोमाटो घालणे आणि पूर्ण पणे शिजवणे.
  • त्यात कोळंबी आणि लसूण घालुन अजून २-३ मिनिट शिजवणे.
  • त्यात हळद, तिखट, गरम मसाला, जिरे पूड, मिरे पूड आणि मीठ घालणे व तेल बाजूला निघेपर्यंत भाजणे.
  • त्यात धने पूड घालुन अजून एक-दोन मिनिट शिजवणे व बाजूला ठेवणे.
  • ओव्हन २००C/४००F वर गरम करणे.
  • बेकिंग ट्रेला तुपाचा किंवा लोण्याचा हात लावणे.
  • प्रत्येत पेस्ट्री शिटला ३ उभ्या भागांत आणि २ आडव्या भागात कापून त्याचे १२ तुकडे करणे. प्रत्येक तुकड्यावर कोळंबीचे मिश्रण घालुन दुमडून बेकिंग ट्रेवर ठेवणे.
  • अंडे फेटून घेणे व एक टिशू त्यात बुडवून पफ वर फिरवणे.
  • ओव्हन मध्ये २००C/४००F वर १५ मिनिट भाजणे व गरम गरम खायला देणे.

टीप
मी मध्यम आकाराचे कोळंबी वापरलेली त्यामुळे मला त्याचे तुकडे करावे लागले नाहीत
अंड्याचा वापर केल्यानी वरून एकदम छान गुलाबी होतात.

खरबूजाची लस्सी


२ आठवड्यांपूर्वी मी एकदम वेगळा प्रयोग करून पहिला. फ्रीजमध्ये एक जुने खरबूज होते आणि दही होते त्यातून निर्माण झालेली हि कृती

खरबूजाची लस्सी
साहित्य
१ खरबूज
६ वाटी दही
५ चमचे साखर
एक थेंब व्हॅनिला इसेन्स
मीठ

कृती
  • खरबूज बारीक कापून घेणे
  • थोडे तुकडे वरून वापरण्यासाठी बाजूला ठेवणे व बाकीचे मिक्सरमध्ये वाटून घेणे.
  • ज्यूस गाळून घेणे आणि दह्यात मिसळणे.
  • त्यात साखर, मीठ, व्हॅनिला इसेन्स घालुन पुन्हा चांगले ढवळणे.
  • प्यायला देताना ग्लासमध्ये वरून खरबुजाचे तुकडे घालुन थंड करून देणे.

टीप
मी एकदम घट्ट दही वापरलेले आणि पाण्याचा बिलकुल वापर नाही केला कारण खाराबुजाचेच पाणी वापरल्यानी चव चांगली आली.

गार्डन सॅलेड


हे सॅलेड मी एकदम अचानकच बनवण्याचे ठरवले आणि एकदम चांगले पण झाले त्यामुळे इथे कृती देत आहे

गार्डन सॅलेड
साहित्य
१ वाटी लेट्युस
१/२ वाटी अननस
१/२ वाटी आंबा
१ उकडलेला बटाटा
१ टोमाटो
१ लाल मिरची
१/२ चमचा ओरेगनो
१/४ वाटी पिकल्ड काकडी
२ चमचा व्हिनेगर
मीठ

कृती
  • भांड्यात चिरलेले लेट्युस घालणे
  • त्यात अननस आणि आंब्याचे तुकडे घालणे
  • त्यात टोमाटो चिरून घालणे
  • उकडलेल्या बटाट्याची साल काढून तुकडे करणे आणि मिसळणे
  • त्यात बारीक चिरलेली लाल मिरची, पिकल्ड काकडी घालणे
  • मीठ, ओरेगनो आणि व्हिनेगर घालुन एकत्र करणे. व वाढणे.

टीप
मी सगळे पदार्थ वेग वेगळे कापून ठेवलेले आणि जेवणाच्या अर्धा तास आधी एकत्र केले त्यामुळे त्यांची चव शाबूत राहिली आणि खाण्यास चांगले लागले.

इडली


मी बरेच लोकांना बाहेरून इडलीचे पीठ आणताना किंवा इंस्टन्ट मिश्रण वापरताना बघितलय पण मला त्याची चव फार काही आवडत नाही. इडली करायला इतकी सोपी आहे की आज काल अजॉयसुद्धा एखाद वेळी बनवतो.

इडली
साहित्य
१ वाटी उडीद डाळ
२ वाटी इडली रवा
मीठ
तेल

कृती
  • उडीद डाळ आणि इडली रवा वेग वेगळ्या भांड्यात कमीत कमी ८ तास भिजवून ठेवणे.
  • उडीद दालीतील पाणी काढून बारीक वाटून घेणे.
  • इडलीच्या राव्यातील पाणी पण काढून ते पण वाटून घेणे.
  • दोन्ही वाटलेले मिश्रण एकत्र करून ८ तास आंबावण्यासाठी उबदार जागी ठेवणे.
  • सकाळी पिठात मीठ घालुन फेटून घेणे.
  • कुकरमध्ये पाणी घालुन उकळवणे.
  • इडलीच्या भांड्यांना तेलाचा हात लावून त्यात पीठ घालणे.
  • इडली भांडी कुकरमध्ये ठेवून झाकण लावून (शिट्टी न लावता) १०-१२ मिनिट मोठ्या आचेवर उकडून घेणे.
  • कुकर उकडून इडली २-३ मिनिट थंड करणे व मग काढून खायला देणे.

टीप
इथे हवामान थंड असल्यानी पीठ आंबावण्यासाठी गरम पाणी भरलेल्या भांड्यावर ठेवले.
इडली उकडल्या उकडल्या कुकरचा झाकण काढायला विसरू नये नाहीतर वाफेच पाणी जाऊन इडल्या मऊ होतील

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP