कोळंबीचे सॅन्डविच


सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्या. माझे नवीन वर्ष एकदम शांत होते, खूप जास्त जेट लॅगमुळे ९ वाजेपर्यंत जागणेपण मुश्कील झालेय. हि पाककृती खास आहे कारण ह्याची तयारी आदल्यावर्षी कायला चालू केली आणि पदार्थ ह्या वर्षी तयार झाला. हा मी अजॉयच्या खास मागणीवर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवला.

कोळंबीचे सॅन्डविच
साहित्य
१४-१६ ब्रेडचे तुकडे
४०० ग्राम कोळंबी
१/२ वाटी आम्बवलेली काकडी
४ चमचे दही
१ चमचा तिखट
१ चमचा धने पूड
१/२ चमचा मिरे पूड
१/४ चमचा चाट मसाला
१/४ चमचा जीरा पूड
१/४ चमचा गरम मसाला
१/४ चमचा हळद
१/२ वाटी लोणी
मीठ

कृती
  • दही, तिखट, हळद, धने पूड, मिरे पूड, जीरा पूड, गरम मसाला, चाट मसाला आणि मीठ एकत्र करणे.
  • कोळंबीचे बारीक तुकडे करून ते दह्याच्या मिश्रणात घालुन एकत्र करणे व फ्रीजमध्ये ४-५ तास ठेवून देणे.
  • तवा गरम करून त्यात १/४ वाटी लोणी आणि कोळंबीचे मिश्रण घालणे.
  • तेज आचेवर सारखे परतत मिश्रण सुकेपर्यंत शिजवणे.
  • सॅन्डविच बनवण्यासाठी ब्रेंडच्या तुकड्यांवर आम्बवलेली काकडी आणि शिजवलेले कोळंबीचे मिश्रण घालुन लोणी लावून ग्रील करणे.

टीप
कोळंबीचे बारीक तुकडे केल्यानी एका घासातच पूर्ण कोळंबी निघून येणार नाही.

कलाकंद


आज सकाळी काहीतरी गोड बनवण्याचा विचार करताना मेहुलनी त्याच्या कार पूजेच्यावेळी दिलेला कलाकंद आठवला. थोडा फार शोधल्यावर लक्षात आला की करायला एकदम सोप्पा आहे. पण जेंव्हा बनवला तेंव्हा लक्षात आला की सोप्पा असला तरी खूप किचकट आणि वेळ लागणार काम आहे.

कलाकंद
साहित्य
२ लिटर दुध
१ वाटी साखर
३ चमचे व्हिनेगर
१ चमचा पिस्ता
१ थेंब केवडा इसेन्स
चांदीचा वर्ख

कृती
  • निम्मे दुध उकळून घेणे
  • ३ चमचे पाणी आणि व्हिनेगर एकत्र करून उकळत्या दुधात घालणे.
  • दुधातून पनीरवेगळे झाले की लगेच गाळून घेवून थंड पाण्याखाली धुवून घेणे.
  • पंचात पनीर घालुन पाणी जाऊ देण्यासाठी टांगून ठेवणे.
  • उरलेले दुध उकळून घेणे व त्यात बनवलेले पनीर घालुन मिश्रण आटेपर्यंत मध्यम आचेवर शिजवणे.
  • त्यात साखर आणि केवड्याचा इसेन्स घालुन पुन्हा मुश्रन घट्ट होईपर्यंत शिजवणे.
  • ताटलीत मिश्रण टाकून पसरवणे व त्यावर चांदीचा वर्ख आणि पिस्ते लावणे.
  • थंड झाल्यावर कापून तुकडे करणे व खायला देणे.

टीप
मी मिश्रण नॉनस्टिक भांड्यात उकळायला ठेवलेले पण त्यात ते चांगले होत नसल्यानी अ‍ॅलुमिनियम भांड्यात केले. अ‍ॅलुमिनियम भांडेच मला गोड पकवान बनवायला बरे वाटते.
दुध उकळवताना सारखे ढवळणे महत्वाचे आहे नाहीतर भांड्याला दुध लागून त्यात करपट वास जातो.
५ नोव्हेंबर: मी आज २ लिटरऎवजी २ गॅलन दुधाची मिठाई बनवण्याचे ठरवले पण पनीर घातल्यावर दुध आटवण्यासाठी खूप जास्त वेळ लागला. त्यामुळे जर खूप सारे मिठाई बनवण्याचा बेत असेल तर तसा अंदाज आधी पासूनच बांधावा. साधारणपणे २ लिटर दुधाच्या १६ बर्फ्या होतात

बेरी नटी चॉकोचीप केक


ह्या आठवड्याच्या सामानाबरोबर क्रॅन्बेरी आणली कारण मला त्याचा ज्यूस आवडतो. एक घास खाल्यावारच लक्षात आले की ह्या बेरी अशाच खाण अशक्य आहे. मग मी बराच वेळ बघत होते काय करता येईल ते पण काहीच पसंत पडत नव्हते. शेवटी मी माझ्या मनानीच काहीतरी बनवण्याचे ठरवले.

बेरी नटी चॉकोचीप केक
साहित्य
२ वाटी मैदा
१ वाटी साखर
१ वाटी क्रॅन्बेरी
१ वाटी चॉकोचिप्स
१ वाटी सुकामेवा
१ वाटी द्राक्ष
१/२ वाटी लोणी
१.५ चमचा बेकिंग पूड
१/२ चमचा बेकिंग सोडा
१ अंडे
४ चमचा चॉकोलेट सॉस
मीठ

कृती
  • सुकामेवा, क्रॅन्बेरी बारीक कापणे आणि चॉकोचिप्स बरोबर एकत्र करणे.
  • मैदा, बेकिंग पूड, बेकिंग सोडा आणि मीठ एकत्र चाळून घेणे.
  • ओव्हन ३५०F/१८०C वर गरम करणे.
  • केकच्या भांड्याला लोण्याचा हात लावणे.
  • मोठ्या भांड्यात चाळलेले मिश्रण आणि साखर एकत्र करणे.
  • त्यात वितळवलेले लोणी घालुन हातानी एकत्र करणे.
  • द्राक्षांचा मिक्सर मध्ये रस काढून मिश्रणात घालणे.
  • त्यात अंडे आणि सुकामेवा-चॉकोचिप्स चे मिश्रण घालणे व फेटणे.
  • केकचे मिश्रण लोणी लावलेल्या भांड्यात ओतणे व ओव्हनमध्ये ३५०F/१८०C वर ४५ मिनिट भाजणे.
  • केक थंड झाल्यावर त्यावर चॉकोलेट सॉस घालुन खायला देणे.

टीप
मिश्रण पातळ नसले तरी घाबरू नये ह्या केकचे मिश्रण असेच असते.
माझ्याकडे सुकामेव्याचे मिश्रण होते म्हणून मी ते वापरले पण कुठलेही ड्रायफ्रुट्स एकत्र करून वापरता येईल.

जाड पोह्याचा चिवडा


चिवडा हा सगळ्यांची कमजोरी आहे :) ह्या प्रकारचा चिवडा आमच्या घरी फार वेळा करतात, पातळ पोह्यापेक्षासुद्धा जास्त.

जाड पोह्याचा चिवडा
साहित्य
२ वाटी जाड पोहे
२.५ चमचा तिखट
१/४ चमचा तीळ
१/४ चमचा जीरा
१/२ वाटी शेंगदाणे
१/४ वाटी फुटाणे डाळ
१.५ चमचा साखर
७-८ कडीपत्ता पाने
४ चमचे काजू
४ चमचे मनुका
१/४ चमचा म्हवरी
चिमुटभर हिंग
मीठ
तेल

कृती
  • जीरा आणि तीळ एकत्र कमी आचेवर तेलाविना साधारण ३-४ मिनिट भाजून घेणे.
  • मिक्सरमध्ये जीरा, तीळ आणि साखर एकत्र पूड करणे.
  • एका मोठ्या भांड्यात ती पूड, २ चमचा तिखट, काजू, मनुका आणि मीठ एकत्र करणे.
  • कढईत मध्यम आचेवर तेल गरम करणे.
  • पोहे एकावेळी थोडे थोडे करून तळून घेणे.
  • तेलातून काढल्या काढल्या लगेच टिशू वर तेल शोषून घेण्यासाठी ठेवावे. २-३ भाग टिशूवर आले की त्यांना मसाल्याच्या मिश्रणात घालुन ढवळणे.
  • सगळे पोहे तळून झाल्यावर एक दोन चमचा तेल गरम करावे व त्यात शेंगदाणे तळून घेणे.
  • त्याच तेलात म्हवारीची फोडणी करणे व त्यात हिंग, कडीपत्ता आणि फुटाणे डाळ घालुन २ मिनिट तळून घेणे.
  • त्यात शेंगदाणे आणि उरलेले १/२ चमचा तिखट घालुन चिवड्यात घालणे व ढवळणे.

टीप
कढईत थोडे थोडे तेल घालूनच पोहे तळावे कारण तेल काळे पडते त्यामुळे जास्त तेल वाया नाही जात
तेलात गाळणी ठेवून त्यात पोहे घातल्यानी ते बाहेर काढायला सोप्पे जाते
मी पोह्याचे तेल शोषून घेण्यासाठी त्यांना टिशूवर काढले पण पोहे गरम असतानाच मसाल्यात घालावे नाहीतर मसाला त्यांना नीट चिकटत नाही.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP