चकली


ह्या दिवाळीला मी थोडा फराळ करण्याचे ठरवले. त्याची तयारी आईकाढून त्याच्या कृती घेण्यापासून झाली. जेंव्हा मी चकलीची कृती पहिली, मला विश्वास नव्हता की ती बनवणे इतके सोप्पे आहे.

चकली
साहित्य
२ वाटी तांदुळाचे पीठ
१ चमचा मैदा
१/२ चमचा तिखट
१/४ चमचा तील
१/४ चमचा ओवा
१/४ वाटी लोणी
तेल
मीठ

कृती
  • तांदुळाचे पीठ, मैदा, तीळ, ओवा, तिखट आणि मीठ एकत्र करणे.
  • त्यात लोणी घालुन चांगले मळणे.
  • पाणी घालुन मऊ पीठ भिजवणे.
  • त्यातला अर्धा भाग चकलीच्या पत्रात घालणे.
  • तेल उंच आचेवर गरम करणे व लगेच आच मध्यम करून त्यात चकली बनवून तळणे.
  • दोन्ही बाजूनी गुलाबी झाल्यावर चकली तेलातून काढणे. उरलेल्या चकल्या तळताना तेल चांगले गरम असल्याची खात्री करणे.
  • चकल्या थंड झाल्यावर एअर टाईट डब्यात ठेवणे.

टीप
जर घरचे लोणी वापरायचे असेल तर थंड पाण्यानी ते धुवून घ्यावे.
चकली गुलाबी असतानाच बाहेर काढावी कारण नाहीतर ती करपेल.

तंदुरी चिकन


सगळ्यात आवडता स्टारटर. हैद्राबादमध्ये असताना मी एव्हरेस्टचा मसाला वापरून बनवायचे पण आज इथे वेगवेगळे मसाले एकत्र करून बनवले

तंदुरी चिकन
साहित्य
६ कोंबडीचे पाय
३/४ वाटी दही
२ चमचा तिखट
१ चमचा गरम मसाला
२ चमचा आले पेस्ट
२ चमचा लसूण पेस्ट
४ चमचे लिंबू
१/२ चमचा चाट मसाला
२ चमचा तेल
१/२ चमचा लोणी
मीठ

कृती
  • कोंबडीच्या पायांवर धार धार चाकुनी चिरा मारणे.
  • त्याला २ चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा तिखट लावून ३० मिनिट बाजूला ठेवणे.
  • एका भांड्यात दही, लसूण पेस्ट, आले पेस्ट, १ चमचा तिखट, २ चमचा लिंबाचा रस, गरम मसाला, तेल आणि मीठ एकत्र करणे.
  • हे मिश्रण कोंबडीला लावून फ्रीजमध्ये ४-५ तास ठेवणे.
  • ओव्हन ३९५F/२००C वर गरम करणे.
  • लोणी वितळवून चिकनवर सोडणे व ओव्हनमध्ये १५ मिनिट भाजणे
  • तुकडे परतवणे व लोणी सोडणे. अजून १५ मिनिट भाजणे.
  • पुन्हा परतवून लोणी सोडणे व १० मिनिट भाजणे.
  • चाट मसाला पसरवून, कांदा आणि लिंबाच्या तुकड्याबरोबर खायला देणे.

टीप
लेगच्याऎवजी ७०० ग्राम कुठलेही तुकडे वापरता येतील
हॉटेलमध्ये लाल रंग येण्यासाठी रंगाचा वापर करतात माझ्याकडे तो नसल्यानी आणि वापरायची इच्छा नसल्यानी मी वापरला नाहीये.
मी भाजण्यासाठी ह्या भांड्याचा वापर केला. त्यामुळे जास्तीचे तेल/लोणी खाली तव्यावर साठते.

सेट डोसा


बँगलोरमध्ये पहिल्यांदा खाल्यापासून सेट डोसा हा माझा आवडता झाला. एकदम हलका फुलका आणि ३ मध्यम आकाराचे डोसे एका वेळी वाढला जाणारा हा डोसा फारच चविष्ठ आहे. बऱ्याच वेळ शोधल्यावर अस लक्षात आले की बहुतेकजण त्यात सोड्याचा व पोह्याचा वापर करतात. त्यावरून मी माझ्या सेट डोश्यासाठी थोडे साहित्य बदलून वापरले. एकदमच सुंदर झालेला. इतका की २ आठवड्यांपूर्वी केलेला फोटो काढण्यासाठी सुद्धा शिल्लक राहिला नाही. अजॉयनी पुन्हा बनवण्यासाठी सांगितल्यावर मी लगेच ह्या आठवड्यात बनवला आणि पहिल्यांदा फोटो काढला.

सेट डोसा
साहित्य
२ वाटी तांदूळ
१ वाटी इडली रवा
३/४ वाटी उडीद डाळ
१ वाटी पोहे
१ चमचा मेथी बिया
मीठ
तेल

कृती
  • तांदूळ, इडली रवा, उडीद डाळ आणि मेथी बिया वेगवेगळ्या सकाळी भिजवणे.
  • संध्याकाळी सगळे वाटायच्या आधी १ तास पोहे पाण्यात भिजवणे.
  • तांदूळ बारीक वाटून घेणे.
  • उडीद डाळ आणि मेथी बिया एकत्र करून बारीक वाटणे.
  • इडली रवापण बारीक वाटणे.
  • पोहे बारीक वाटणे.
  • सगळे वाटलेले मिश्रण चांगले एकत्र करून घेणे व रात्रभर आंबवण्यासाठी उबदार जागी ठेवणे.
  • दुसऱ्या दिवशी सकाळी पिठात मीठ आणि थोडे पाणी घालुन चांगले पसरेल असेल मिश्रण बनवणे.
  • तवा मध्यम आचेवर गरम करून त्यावर थोडे तेल पसरवणे व एक वाटी पीठ ओतणे.
  • खालची बाजूल गुलाबी झाली की वरून १-२ थेंब तेल टाकून परतणे व दुसरी बाजू होईपर्यंत भाजणे

टीप
हा डोसा नेहमी मिक्स भाजीबरोबर खायला देतात पण मला ती भाजी फार आवडत नाही त्यामुळे मी त्याऎवजी ह्या शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खायला दिला.

खतखते


मला एकदम लहान असल्यापासून हा पदार्थ खूप आवडतो. बेळगावला काकीकडे गेल्यावर तिथे खायचो. आतापर्यंत मला लक्षात नव्हता आला की हा एकदम तब्येतीसाठी उत्कृष्ठ पदार्थ आहे :) नावाप्रमाणेच फ्रीजमधले सगळे संपवण्यासाठी एकदम उत्तम

खतखते
साहित्य
१ वाटी घेवडा
१/२ वाटी मटार
२ शेवग्याच्या शेंगा
२ कणीस
१ बटाटा
१ रताळे
१ कच्चे केळे
१.५ चमचा चिंच
१/४ वाटी गुळ
१/२ वाटी खोबरे
१/४ चमचा धने
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
चिमुटभर हिंग
२ चमचा तूप
मीठ

कृती
  • अर्धा वाटी पाण्यात चिंच भिजवणे.
  • मोठ्या भांड्यात घेवडा आणि ४ वाटी पाणी घालुन मोठ्या आचेवर ५ मिनिट शिजवणे.
  • कणीस ३ तुकडे करून त्यात घालणे. २ वाटी पाणी घालुन अजून ५ मिनिट शिजवणे.
  • त्यात शेवग्याच्या शेंगा, बटाटे, रताळे, कच्चे केळे आणि २ वाटी पाणी घालुन अर्धवट शिजवणे.
  • त्यात खोबरे, चिंच आणि घने अर्धा वाटी पाणी घालुन वाटून घालणे.
  • भाज्या शिजत आल्याकी त्यात मटार घालणे.
  • हळद, गुळ, तिखट आणि मीठ घालुन उकळवणे.
  • छोट्या कढईत तूप आणि म्हवरी घालुन फोडणी करणे व हिंग घालणे. फोडणी भाजीत घालणे.

टीप
ह्यात १ वाटी भोपळ्याचे तुकडे पण घालता येतील पण इथे मला न मिळाल्यानी वापरले नाहीये.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP