तंदुरी पनीर पिझ्झा


माझा आवडता पिझ्झा :) इथे एका ठिकाणी मिळतो पण मला त्यांची चव नाही आवडत. त्यामुळे मी हा पिझ्झा बनवण्याचा बरेच दिवस विचार करत होते आज शेवटी बनवलाच.

तंदुरी पनीर पिझ्झा
साहित्य
४ वाटी गव्हाचे पीठ
२ वाटी मैदा
४०० ग्राम पनीर
२.५ वाटी मोझारेल्ला चीज
१ वाटी पार्मेसान चीज
१.५ वाटी दुध
५ चमचा दही
२.२५ चमचा यीस्ट
१/२ कांदा
१/४ वाटी सुकवलेले टोमाटो
४ ढोबळ्या मिरच्या
१/४ वाटी ओलिव्ह तेल
२ चमचा लोणी
१/२ चमचा साखर
२ चमचे तिखट
१/२ चमचा जिरे पूड
१/२ चमचा धने पूड
१/४ चमचा गरम मसाला
२ चमचा तंदुरी मसाला
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा आले पेस्ट
१ चमचा बेसिल पाने
मीठ

कृती
  • एक वाटी कोमट पाण्यात साखर आणि यीस्ट घालुन ढवळणे. भांड्याला प्लास्टिकचे झाकण लावून १० मिनिट बाजूला ठेवणे.
  • परातीत गव्हाचे पीठ, मैदा, ओलिव्ह तेल, वितळवलेले लोणी, यीस्टचे पाणी आणि मीठ एकत्र करणे.
  • दुध घालुन मऊसर पीठ मळणे. मोठ्या भांड्यात तेलाचा हात लावून व झाकण लावून २ तास ठेवून देणे.
  • एका भांड्यात दही, आले पेस्ट, लसूण पेस्ट, जिरे पूड, धने पूड, गरम मसाला, तंदुरी मसाला आणि मीठ एकत्र करणे.
  • पनीरचे तुकडे मिश्रणात घालुन चांगले ढवळणे व फ्रीजमध्ये ठेवणे.
  • पीठ दुप्पट झाल्यावर त्याचे दोन भाग करून दोन तव्यांवर पसरवणे.
  • त्यावर पार्मेसान चीज, मोझारेल्ला चीज पसरवणे.
  • पनीर चे तुकडे, ढोबळी मिरची, कांदा, सुकलेला टोमाटो, बेसिल पाने पण पसरवणे.
  • ओव्हन ४००F/२००C वर गरम करून त्यात २५ मिनिट पिझ्झा भाजणे.

टीप
यीस्ट वापरताना पाणी कोमट असले पाहिजे, जास्त गरम पाण्यामुळे यीस्ट जळण्याची शक्यता असते आणि पाणी थंड असेल टर यीस्ट नीट फुलणार नाही. सगळे बरोबर झाले टर यीस्टच्या पाण्यात १० मिनिटांनी बुडबुडे आले असतात.
माझा एक पिझ्झा बरोबर झाला आणि दुसरा चांगला फुलाला नाही. थोडे शोधल्यावर कळले की ओव्हनच्या सगळ्यात वरच्या रकान्यात पिझ्झा बनवायला पाहिजे. मध्ये चांगला गरम न झाल्यानी पिझ्झा फुगत नाही.

तिरंगी भात


बरेच दिवस झाले नवीन पोस्ट करून. थोडा स्वयंपाकापासून आराम करत होते. भारतात असताना महिन्यातून एकदा पुण्याला गेल्यावर थोडी विश्रांती व्हायची पण इथे आल्यापासून मला ते सुख नाहीये. इथे आल्यापासून विश्रांती म्हणजे मग फास्टफूड खाऊन आराम करावा लागतो. पण आता मला एकदम ताजे तवाने वाटतेय. हि पाककृती मी अशीच चालू केलेली आणि मनात आले तसे जिन्नस घालत गेले.

तिरंगी भात
साहित्य
९ वाटी भात
२ टोमाटो
मुठभर कोथिंबीर
३ मुठ पालक
१ हिरवी मिरची
१ चमचा धने पूड
१ चमचा तिखट
१/४ चमचा गरम मसाला
भाजलेले काजू
तूप
मीठ

कृती
  • भातात मीठ घालुन त्याचे ३ भाग करणे.
  • मिक्सरमध्ये टोमाटो वाटून घेणे.
  • पालक, कोथिंबीर आणि हिरवी मिरची वाटून घेणे.
  • पालक-कोथिंबीर मिश्रण उकळवणे आणि आटल्यावर त्यात एक भाग भात आणि धने पूड घालुन सुकेपर्यंत शिजवणे.
  • दुसऱ्या भाताच्या भागात दोन चमचे तूप घालुन एकत्र करणे.
  • टोमाटो मिश्रण पण उकळवणे. त्यात तिखट, गरम मसाला आणि उरलेला एक भाग भात घालुन सुकेपर्यंत शिजवणे.
  • सगळे भाताचे भाग ताटलीत पसरवणे व काजू घालुन वाढणे.

टीप
पालक वाटताना मी एकदम थोडे पाणी घालुन १/३ भाग पालक पहिल्यांदा वाटला. मग त्यात अजून थोडा पालक घालुन वाटला असे करत वाटल्यानी पाणी कमी लागते आणि वाटण पातळ नाही होत.
भात बनवताना मी भात शिजल्यावर त्यातले उरलेले पाणी ओतून दिले आणि थंड पाण्याखाली धुतला त्यामुळे सगळे दाणे एकदम वेगवेगळे झाले.

तवा पनीर


सारख्या एक प्रकारच्या भाज्या खाऊन मला फार कंटाळा आलेला. पालक नसल्यानी मला पालक पनीर बनवता नाही आहे. सायकलिंग करून दामल्यांनी आणि दिल मिल गये आणि त्यातले अभी निकी सिन्स बघण्यात मी गुंग असल्यानी स्वताचीच हि तवा पनीरची डीश तयार केली.

तवा पनीर
साहित्य
२०० ग्राम पनीर
१ कांदा
२ टोमाटो
४-५ ढोबळी मिरची
१/४ चमचा हळद
१ चमचा तिखट
१/४ चमचा जिरे पूड
१/४ चमचा धने पूड
१/४ चमचा आमचूर पूड
मीठ
तेल

कृती
  • पनीर, टोमाटो, कांदा, ढोबळी मिरची यांचे मध्यम आकाराचे तुकडे करणे
  • तवा गरम करून त्यात तेल घालुन पनीरचे तुकडे भाजून घेणे.
  • त्याच तेलात कांदा, गुलाबी रंगावर भाजून घेणे.
  • त्याच तेलात ढोबळी मिरची भाजून बाजूला ठेवणे.
  • आता त्याच तेलात टोमाटो घालुन पूर्णपणे शिजवणे.
  • त्यात तिखट, हळद, जिरे पूड, धने पूड आणि आमचूर पूड घालुन २-३ मिनिट परतत शिजवणे.
  • त्यात पनीर, कांदा, ढोबळी मिरची आणि मीठ घालुन चांगले एकत्र करणे व ४-५ मिनिट शिजवून गरम गरम वाढणे.

टीप
मला ह्यात जास्त पदार्थ घालायचे नव्हते तसेच जास्त मसालेदार पण बनवायचे नव्हते. ह्यात पनीर आणि मसाल्याचे एकदम छान संगत देऊन चांगले लागले.
मी नॉनस्टिक तवा जो थोडा खोलगट होता तो वापरला त्यामुळे सगळे पदार्थ ढवळताना बरे पडले.

वांग्याचा पराठा


हल्ली मी खूप पराठे बनवते. बनवायला एकदम सोप्पा आणि भाज्या वगैरे बनवत बसायला नाही लागत. हा पराठा असाच काहीतरी प्रयोग करत बनवला. २-३ वेळा आधी बनवलेला पण कालचा एकदम छान होता त्यामुळे इथे देत आहे.

वांग्याचा पराठा
साहित्य
१ मध्यम आकारच वांग
२ वाटी गव्हाचे पीठ
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
१/४ चमचा जिरे पूड
१/४ चमचा धने पूड
२-३ कोथिंबीर पाने
मीठ
तेल

कृती
  • वांगे ओव्हन मध्ये ५००F वर २५ मिनिट ब्रोईल करणे व मग थंड करणे.
  • वांग्याचे साल काढून आतील गराला चांगले एकत्र करणे.
  • त्यात तिखट, हळद, जिरे पूड, धने पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालणे.
  • गव्हाचे पीठ घालुन पीठ चांगले घट्ट भिजवणे व तेलाचा हात लावून २०-३० मिनिट भिजण्यासाठी ठेवून देणे.
  • लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून, ३ घड्या घालुन पराठे बनवणे.
  • तव्यावर तेल सोडून भाजणे व थंड दही आणि लोणच्याबरोबर वाढणे.

टीप
वांगे भरते बनवताना भाजतात तसे गॅसवर भाजत येईल. ओव्हनमध्ये भाजण्यासाठी इथल्या ओव्हन मधली ब्रोईल बेकिंग पेक्षा चांगले होते त्यामुळे त्यातला रस बाहेर नाही येत आणि त्यामुळे कमी गव्हाचे पीठ वापरून पराठे बनवता येतात आणि वांग्याची चव शिल्लक राहते.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP