हरियाली चिकन बिर्याणी


मला काहीतरी चटपट खावसं वाटत होता म्हणून मी पाणी पुरी बनवलेली. तेंव्हापासून असलेला खूप सारा पुदिना राहिला होता. फ्रीजमध्ये चिकन पण होत आणि अजॉयला बिर्याणी खायची होती. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून हि बिर्याणी तयार झाली. :)

हरियाली चिकन बिर्याणी
साहित्य
६ चिकनचे लेग
२ वाटी बासमती तांदूळ
१/२ पुदिना गड्डी
१/२ कोथिंबीर गड्डी
२ हिरव्या मिरच्या
२ दालचिनी
१/४ चमचा मिरे पूड
४ लवंग
४ वेलची
१/४ वाटी तूप
३ कांदा
१ टोमाटो
१/२ चमचा लसूण पेस्ट
४ चमचा दही
१ चमचा तिखट
चिमुटभर हळद
मीठ

कृती
  • चिकनला तिखट, हळद. लसूण पेस्ट आणि दही लावणे व २ तास बाजूला ठेवणे.
  • ६ वाटी पाणी गरम करणे त्यात तांदूळ अर्धा तास भिजवणे.
  • मिक्सरमध्ये पुदिना, कोथिंबीर, टोमाटो आणि हिरव्या मिरच्या बारीक वाटणे.
  • २ चमचा तूप बाजूला ठेवून उरलेले तूप कढईत गरम करणे.
  • १ कांदा बारीक उभा चिरणे व गुलाबी रंगावर कुरकुरीत तळणे व बाजूला ठेवणे.
  • उरलेल्या तुपात दालचिनी, मिरे पूड आणि उरलेला कांदा बारीक चिरून गुलाबी होईपर्यंत भाजणे.
  • कांद्याचे मिश्रण हिरव्या वाटणात घालुन सगळे बारीक वाटणे.
  • त्याच कढईत वाटलेले मिश्रण, १.५ वाटी पाणी आणि चिकन घालुन एकत्र करणे. मीठ घालुन मिश्रण सुकेपर्यंत शिजवणे.
  • चिकन शिजत असताना तांदुळातील पाणी ओतून त्यात अजून २ वाटी पाणी आणि मीठ घालुन भात शिजवणे. भात शिजत आला की त्यातील उरलेले पाणी ओतून थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • अर्धा चमचा तूप गरम करून त्यात लवंग, वेलची घालुन हलक्या आचेवर तळून घेणे. हे तुपाचे मिश्रण भातात ओतून एकत्र करणे.
  • कुकरला तुपाचा हात लावून त्यावर भाताचा थर लावणे. त्यावर चिकनचे मिश्रण व नंतर उरलेला भाताचा थर देणे. वरून तळलेले निम्मा कांदा घालुन कुकर बंद करणे.
  • कुकर १५ मिनिट मंद आचेवर गरम करणे व वाढत्ना वरून कुरकुरीत कांदा घालुन खायला देणे.

टीप
माझ्याकडे चिकनचे लेग होते म्हणून मी ते वापरले पण त्याऎवजी दुसरे तुकडेपण वापरता येतील.
इथल्या स्टोव्हला ८ स्वीच आहेत, मी त्यातील २ वर बिर्याणीचा कुकर ठेवला. नेहमीच्या स्टोव्हवर कुकर तसाच न ठेवता तवा ठेवून त्यावर ठेवावा म्हणजे बिर्याणी करपणार नाही. तसेच कुकरमध्ये सगळ्यात खाली उकडलेल्या बटाट्याच्या चकत्या लावल्यानीपण मदत मिळते.

खिमा अंडी मसाला


आमच्या तात्पुरत्या राहण्याच्या घरातून, भाड्याच्या घरात जायच्या आधी माझ्याकडे बरेच खाण्याचे सामान उरलेले. आणि खूप सारे सामान हलवायचे नसल्यानी काहीतरी बनवण्याच्या प्रयत्नातून हि पाककृती तयार झाली.

खिमा अंडी मसाला
साहित्य
४५० ग्राम खिमा
४ टोमाटो
२ कांदे
३ अंडी
१ चमचा गरम मसाला
१.५ चमचा तिखट
१ चमचा हळद
१/४ चमचा मिरे पूड
२-३ दालचिनी
१/४ चमचा लसूण पेस्ट
१/४ चमचा आले पेस्ट
१/२ चमचा धने पूड
चिमुटभर जिरे पूड
कोथिंबीर
मीठ
तेल

कृती
  • अंडी उकडून घेणे व बाजूला ठेवणे.
  • कढईत तेल गरम करणे व त्यात खिमा घुवून घालणे व गुलाबी रंगावर तेल सुटेपर्यंत भाजणे व बाजूला ठेवणे.
  • त्याच तेलात मिरे पूड, दालचिनी घालुन गुलाबी रंगावर भाजणे.
  • त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण पेस्ट, आले पेस्ट घालुन भाजणे.
  • हळद, १ चमचा तिखट, गरम मसाला, धने पूड आणि जिरे पूड घालुन एकत्र करणे व २-३ मिनिट भाजणे व नंतर थंड करणे.
  • मिश्रण मिक्सरमध्ये घालुन बारीक वाटणे.
  • कढईत चमचाभर तेल घालुन वाटलेले मिश्रण, बारीक चिरलेला टोमाटो घालुन शिजवणे.
  • त्यात १/४ वाटी पाणी, मीठ आणि भाजलेला खिमा घालुन पूर्ण शिजेपर्यंत व सुकेपर्यंत शिजवणे
  • अंडी किसने व त्यात हळद, तिखट आणि मीठ घालुन एकत्र करणे.
  • खिमा वाढताना त्यावर वरील अंड्याचे मिश्रण व बारीक चिरलेली कोथिंबीर घालुन खायला देणे.

टीप
किसलेल्या अंड्यांच्याऎवजी चीज किवा पनीरपण वापरता येईल.

हिरवे सॅलेड


इथे आल्यापासून वेग वेगळे समान खूप पटकन मिळते म्हणून मी थोडा वेगळा प्रयोग करायचा ठरवला. इथे माझा पहिला सॅलेड बनवायचा प्रयोग देत आहे.

हिरवे सॅलेड
साहित्य
१० हिरव्या लेट्युसची पाने
१/२ वाटी ग्रेप टोमाटो
१/२ अननस
१/४ वाटी कॉर्न
१० पिकल्ड काकडी
५ पिकल्ड मिरची
१/२ चमचा ओरिगानो
२.५ चमचा रांच ड्रेसिंग
मीठ

कृती
  • कॉर्न उकळत्या पाण्यात किंवा मायक्रोवेव्हमध्ये ५ मिनिट शिजवून घेणे. त्यातील पाणी ओतून बाजूला ठेवणे.
  • लेट्युस बारीक चिरणे.
  • ग्रेप टोमाटो अर्धे चिरून लेयुसमध्ये घालणे.
  • त्यात अननस बारीक चिरून, पिकल्ड काकडीचे तुकडे अर्धे करून घालणे.
  • त्यात बारीक चिरलेली पिकल्ड मिरची आणि कॉर्न घालुन एकत्र करणे.
  • त्यात रांच ड्रेसिंग, ओरिगानो आणि मीठ घालुन एकत्र करणे.

टीप
एकदम सोप्पा, पौष्टिक आणि चविष्ठ पदार्थ आहे. रांच ड्रेसिंग आणि ओरिगानो एकदम चांगला लागत होता. अजून वेगवेगळ्या भाज्या, फळे आणि ड्रेसिंग वापरायचा बेत आहे.

वाढदिवसाचा चॉकलेट केक


मला अगदी पहिल्यापासून चॉकलेटच आईसिंग फार आवडायचं. प्रत्येक वेळी वाटायचं की आईसिंग एकदम बेकरीवाल्यांसारख कधीतरी बनवता यायला पाहिजे. प्रत्येक वेळी वाटायचं की त्यात काहीतरी कला आहे जी जमण जरा मुश्कील असेल. पण हा केक करताना कळला की जर थोडासा सय्यम आणि त्याची छोटीशी युक्ती माहिती असेल तर खूप सोप्पं आहे.

वाढदिवसाचा चॉकलेट केक
साहित्य
७ चमचे लोणी
१ वाटी पिठी साखर
३ अंडी
मीठ चवीपुरते
१/२ वाटी मैदा
३००ग्राम चॉकलेट
८ चमचे कोको पूड

कृती
  • एका भांड्यात पाणी उकळवून त्यावर दुसरे भांडे ठेवीन १००ग्राम चॉकलेट वितळवणे. त्यात ४ चमचे कोको पूड घालुन ढवळून बाजूला ठेवणे.
  • दुसऱ्या भांड्यात ६ चमचे लोणी आणि १/२ वाटी पिठी साखर घालुन फेटून घेणे.
  • त्यात वितळवलेले चॉकलेट घालुन पुन्हा फेटणे.
  • दोन भांड्यात अंड्याचे पांढरे आणि पिवळे वेगवेगळे करणे.
  • लोणी आणि चॉकलेट मिश्रणात एकावेळी एक एक अंड्याचे पिवळे घालत फेटून घेणे.
  • मैदा चाळून बाजूला ठेवणे.
  • दुसऱ्या भांड्यात अंड्याचे पांढरे आणि मीठ एकत्र करून चांगले फेटून घेणे.
  • चॉकलेटच्या मिश्रणात एका वेळी एक चमचा अंड्याचे पांढरे आणि एक चमचा मैदा असे घालत अलगद एकत्र करणे.
  • ओव्हन १८०C/३५०F वर गरम करणे.
  • केकच्या भांड्याला तेलाचा हात लावून त्यात केकचे मिश्रण ओतणे.
  • केक १८०C/३५०F वर ४५ मिनिट भाजणे व रात्रभर थंड होण्यासाठी बाहेर ठेवणे.
  • दुसऱ्यादिवशी एका भांड्यात पाणी गरम करून त्यावर काचेचे भांडे ठेवणे. त्यात उरलेले लोणी आणि चॉकलेट घालुन एकत्र वितळवणे
  • दुसऱ्या भांड्यात उरलेली साखर आणि अर्धा वाटी पाणी घालुन उकळवणे.
  • आच एकदम मंद करून त्यात वितळवलेले चॉकलेट-लोणी आणि उरलेली कोको पूड घालुन शिजवणे.
  • थोडेसे हातावर घेवून मिश्रण सेट होतंय का ते बघणे. झालेतर आईसिंग तयार आहे.
  • गरम गरम आईसिंग केकच्या मध्यभागावर ओतून पूर्ण केकवर पसरवणे.
  • बटर आईसिंग आणि चॉकलेटच्या तुकड्यांनी सजवणे.

टीप
एकदम बरोबर वाचलंय! :) केकमध्ये बेकिंग सोडा किंवा बेकिंग पूड लागत नाही. :)
मी हे आई बाजूला असताना बनवला त्यामुळे तिच्या मार्गदर्शन आणि सय्यम वापरून मी ४ चमचे कोको पूड २००ग्राम चॉकलेटसाठी वापरून हे आईसिंग बनवले. पण जर आईसिंग पातळ असेल तर त्यात अजून कोको पूड घालता येईल. आणि जर आईसिंग घट्ट असेल तर थोडे गरम पाणी घालता येईल. आईसिंग थंड झाल्यावर आईसिंग सारखे पाहिजे, पातळ किंवा जास्त घट्ट नको.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP