लिंबू आणि अ‍ॅप्रिकॉटचा केक


मी अजॉयच्या वाढदिवसासाठी पाउंड केक सारखा पण थोडा जास्त रिच असा केक शोधात होते. त्याला प्लेन केक हा प्रकार फार आवडतो त्यामुळे त्याच्यासारखाच पण थोडा भारी :) असा हा केक मी माझ्याकडच्या एका पुस्तकातील कृती बघून आणि थोडा आमच्या चवीनुसार प्रमाण बदलून केला. मला ह्या केक मध्ये लिंबू नाहीतर संत्र वापरायाचच होत, इतके दिवस फूड नेटवर्कवरच्या कार्यक्रमात त्यांच्या सालीचा वापर करताना बघून प्रत्यक्षात कसा लागत हे जरा जाणून घ्यायचं होत त्यामुळे ह्यात मी लिंबाचा वापर केलाय

लिंबू आणि अ‍ॅप्रिकॉटचा केक
साहित्य
३ वाटी मैदा
१७५ ग्राम अ‍ॅप्रिकॉट
१ वाटी बदाम
१.२५ वाटी पिस्ता
२/३ वाटी उभे चिरलेले बदाम
२ वाटी साखर
१ + १/३ वाटी लोणी
१.२५ चमचा बेकिंग पूड
३ अंडी
१/३ चमचा मीठ
१ मोठं लिंबू

कृती
  • ओव्हन १८०C/३५०F वर गरम करणे.
  • एका मोठ्या भांड्यात लोणी आणि १.५ वाटी साखर एकत्र करून घोटणे.
  • मैदा आणि बेकिंग पूड एकत्र ३-४ वेळा चाळून घेणे व लोणी-साखरेच्या मिश्रणात घालणे.
  • त्यात अंडी, मीठ, लिंबाची साल किसून, १/२ वाटी कोमट पाणी घालुन पुन्हा एकत्र फेटणे.
  • त्यात बारीक चिरलेले अ‍ॅप्रिकॉट, १ वाटी बदाम पूड करून आणि १ वाटी पिस्ता बारीक चिरून अलगद एकत्र करणे.
  • लोफच्या किंवा केक बनवायच्या कुठल्याही आकाराच्या भांड्याला लोण्याचा हात लावून पार्चमेंट कागद खाली व बाजूना लावणे. त्यात केकचे मिश्रण चमच्यानी घालुन एकसारखे करणे.
  • उरलेले पिस्ता आणि चिरलेले बदाम वर घालुन ते अलगद मिश्रणात दाबणे
  • केक ७५ मिनिट १८०C/३५०F वर भाजणे. साधारण ५० मिनिट भाजल्यावर त्यावर अल्युमिनियमचा कागद वरून लावणे व उरलेला वेळ भाजणे.
  • ओव्हनमधून केक बाहेर काढून १० मिनिट थंड होण्यासाठी बाहेर ठेवणे.
  • त्यावेळात मध्यम आचेवर लिंबाचा रस आणि उरलेली साखर एकत्र करून ती विरघळेपर्यंत व त्यानंतर थोडे बुडबुडे येईपर्यंत शिजवणे.
  • मिश्रण गरम असताना केकवर ओतणे व केक अलगद बाहेर काढणे व थंड होण्यासाठी ठेवणे.

टीप
केक भाजताना मध्ये अल्युमिनियमचा कागद लावल्यानी वर लावलेले बदाम आणि पिस्ते जास्त भाजून करपत नाहीत.

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP