आम्रखंड


अजॉयला पुरी आणि आम्रखंड फार आवडते त्यामुळे इथे आमरस कुठे मिळतो ते कळल्यावर मी लगेच बनवले. एकदम छान झालेले.

आम्रखंड
साहित्य
१ लिटर दुध
१.५ वाटी साखर
१ वाटी आमरस
१ चमचा दही

कृती
  • दुध कोमट करून त्यात दही एकत्र करून ६-८ तास गरम जागी ठेवून दही लावणे.
  • पंचावर दही ओतून ते टांगून ८-१० ठेवणे म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल व चक्का तयार होईल.
  • चक्क्यात साखर घालुन दोन तास ठेवणे.
  • त्यात आमरस घालुन पुरण यंत्रातून फिरवणे

टीप
साखर आमरसाच्या गोडीप्रमाणे कमी जास्त करणे. मी जो आमरस वापरला तो जास्त गोड नव्हता त्यामुळे साखर एकदम व्यवस्थित झाली.
साखर चक्क्यात एकत्र करून ठेवल्यानी चांगली एकत्र होते नाहीतर दही आंबट होऊन साखर वेगळी राहते.

पन्ह


हे एकदम ताजे तवाने करणारे पैय्या मी ह्या वर्षीच्या पहिल्या कैरींचे बनवले.

पन्ह
साहित्य
३ कैऱ्या
२.५ वाटी गुळ
मीठ

कृती
  • कैरीची साल काढून त्याचे तुकडे करणे.
  • कुकरमध्ये पाणी घालुन उकडणे.
  • कैरी थंड झाली की मिक्सरमध्ये वाटून मिश्रण गाळून घेणे.
  • त्यात गुळ आणि मीठ घालुन विरघळेपर्यंत ढवळणे.
  • अजून थोडे थंड पाणी घालुन पातळ पन्ह बनवणे.

टीप
गुळाचे प्रमाण कैरीच्या आंबटपणाप्रमाणे बदलावे लागते

मुंग डाळ वडी


काल मी मुंग डाळ हलवा बनवायचे ठरवलेले पण शेवटी वडी बनवली

मुंग डाळ वडी
साहित्य
१ वाटी मुंग डाळ
३/४ वाटी तूप
१/४ वाटी खवा
२ वाटी साखर
२ वाटी दुध
बदाम

कृती
  • डाळ ४-५ तास पाण्यात भिजवणे व नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटणे.
  • तूप गरम करून त्यात मुंग डाळीचे वाटण घालुन हलक्या आचेवर परतत भाजणे.
  • डाळ गुलाबी झाली की त्यात दुध घालुन मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवणे.
  • त्यात खवा घालुन अजून थोडा वेळ शिजवणे.
  • त्यात साखर घालुन मंद आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवणे.
  • ताटलीला तुपाचा हात लावून त्यावर डाळीचे मिश्रण पसरानते व त्यावर बदामाचे तुकडे लावून दाबणे.
  • थंड झाल्यावर चौकोनी वड्या कापून खायला देणे.

टीप
मुंग डाळ एकदम मंद आचेवर भाजणे नाहीतर ती करपून जाईल

वाटली डाळ


उन्हाळा चालू झाला की कैरी जेवणात वापरणे चालू होते. असाच हा एक पदार्थ हळदी कुंकूमध्ये एकदम प्रसिद्ध

वाटली डाळ
साहित्य
१ कैरी
१ वाटी हरबरा डाळ
२ हिरव्या मिरच्या
१/४ चमचा साखर
१/४ चमचा हळद
१/४ चमचा म्हवरी
मीठ
तेल

कृती
  • हरबरा डाळ ५-६ तास पाण्यात भिजवणे.
  • डाळ पाण्यातून उपसून त्यात मिरची घालुन बारीक वाटणे.
  • त्यात किसलेली कीर घालुन एकत्र करणे.
  • मीठ आणि साखर घालुन एकत्र करणे.
  • तेल गरम करून त्यात म्हवरीची फोडणी करणे.
  • त्यात हळद घालुन फोडणी डाळीत घालुन एकत्र करणे.

टीप
फोडणीत सुकलेली लाल मिरची पण घालता येईल

मेथी मलई मटार


मला मेथी मलई मटार फार आवडते. बरेच दिवस मी माझ्या आवडीची चव आणण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी श्रीन्खलाला विचारले आणि तिच्याकडून हि पंजाबी कृती घेतली

मेथी मलई मटार
साहित्य
२ मेथी
१ वाटी क्रीम
२ वाटी मटार
१/४ चमचा जिरे
चिमुटभर हिंग
चिमुटभर वेलची पूड
चिमुटभर दालचिनी पूड
चिमुटभर लवंग पूड
१ कांदा
१/२ चमचा खसखस
१.५ चमचा साखर
५-६ चमचे दही
१५-२० काजू
१ हिरवी मिरची
१/४ चमचा आले पेस्ट
मीठ
तूप

कृती
  • ४-५ वाटी पाणी मीठ घालुन उकळवणे व त्यात मेथीची पाने ५ मिनिट भिजवून ठेवणे.
  • पाण्यातून मेथी बाहेर काढून गाळणीवर चांगली दाबून पाणी वेगळे करणे. मिठी बाजूला ठेवणे.
  • मटार उकडून बाजूला ठेवणे.
  • कांदा, खसखस, साखर, दही, काजू, हिरवी मिरची, आले पेस्ट एकत्र वाटणे.
  • क्रीम फेटून घेणे.
  • कढईत तूप गरम करून त्यात जीऱ्याची फोडणी करणे व हिंग घालणे.
  • त्यात वाटलेले मिश्रण घालुन मंद आचेवर तूप सुटेपर्यंत परतणे.
  • त्यात फेटलेले क्रीम, मेथी, मटार आणि मीठ घालुन एकत्र करणे व ग्रेव्ही २ मिनिट शिजवणे.

टीप
मेथीतून पाणी एकदम काढून टाकणे नाहीतर भजी हिरवट होते
खसखस आणि काजू आधी थोडावेळ भिजवलेतर वाटायला सोप्पे जाते
ग्रेव्ही एकदम पातळ वाटल्यास त्यात १/४ चमचे कॉर्न फ्लौर थोड्या पाण्यात एकत्र करून घालणे. जर ग्रेव्ही जाड वाटली तर थोडे दुध घालुन ग्रेव्ही पातळ करता येईल

वडा पाव आणि लसुणाची चटणी


अजॉय खूप दिवसांपासून मला वडा पाव किंवा बटाटे वडा बनवायला सांगत होता. त्यामुळे त्याच्या वाढदिवसाला मी तो बनवायचे ठरवले.

वडा पाव

वडा पाव
साहित्य
२ बटाटे
६ पाव
१/२ वाटी बेसन
१/२ लिंबू
४ हिरव्या मिरच्या
१/४ चमचा लसूण पेस्ट
१/४ चमचा आले पेस्ट
चिमुटभर सोडा
१/४ चमचा म्हवरी
१/२ चमचा हळद
१/२ चमचा तिखट
मीठ
तेल

कृती
  • बटाटे उकडून घेणे.
  • मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, आले पेस्ट, लसूण पेस्ट एकत्र बारीक वाटणे.
  • बटाटे बारीक कापणे व त्यात वाटण आणि लिंबाचा रस घालुन एकत्र करणे.
  • कढईत थोडेसे तेल गरम करून त्यात म्हवरीची फोडणी करणे व अर्धी हळद घालणे.
  • फोडणी बटाट्यात घालुन एकत्र करणे व ६ गोळे बनवणे.
  • एका भांड्यात बेसन, तिखट, उरलेली हळद, खाण्याचा सोडा घालुन पातळ पीठ बनवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यातील २ चमचा तेल बेसनच्या पिठात घालणे.
  • बटाट्याचा गोळा बेसनात बुडवून तेलात तळणे.
  • पाव मध्ये चीर्तून त्यावर लसुणाची चटणी आणि वडा घालुन गरम गरम खायला देणे

टीप
बटाटे वड्याला भिजवायचे बेसनाचे पीठ जाड झाले तर वड्याला चव येत नाही त्यामुळे पीठ पातळ बनवणे.
पिठात तेल घातल्यानी वडे तेलकट होत नाहीत
बटाटा वडा पावाशिवाय पण देता येईल

लसुणाची चटणी

लसुणाची चटणी
साहित्य
१/२ सुके खोबऱ्याची वाटी
१०-१२ लसुणाच्या पाकळ्या
४ चमचे तिखट
१-२ चिंचेचे तुकडे
१/२ चमचा साखर
मीठ

कृती

  • सुके खोबरे किसून घेणे व कढईत गुलाबी होईपर्यंत भाजून घेणे.
  • मिक्सरमध्ये लसुणाच्या पाकळ्या, तिखट, साखर आणि मीठ एकत्र बारीक वाटणे.
  • त्यात चिंच घालुन अजून वाटणे
  • भाजलेले खोबरे घालुन बारीक पूड होईपर्यंत वाटणे.

टीप
हि चटणी थोडे दिवस ठेवता येईल आणि भाकरीबरोबर पण हि चटणी छान लागते

अननस पेस्ट्री


अजॉयच्या वाढदिवसासाठी मी अननसाची पेस्ट्री बनवायचे ठरवलेले. आधीच्या क्रीमच्या अनुभवांनी मी ह्या वेळी थोडी फार माहिती गोळा केली त्यामुळे एकदम मस्त झालेली

अननस पेस्ट्री
साहित्य
१.५ वाटी मैदा
२ चमचे बेकिंग पूड
१/२ चमचा खाण्याचा सोडा
१ वाटी पिठी साखर
१/२ वाटी दुध
२ चमचे लोणी
४ अंडी
१/२ चमचा अननसाचा इसेन्स
१ वाटी क्रीम
१ वाटी टीनड अननस
२ चमचे अननसाचा पाक
१/४ वाटी टीनड चेरी
आईसिंग शुगर
चिमुटभर मीठ

कृती
  • मैदा, बेकिंग पूड, खाण्याचा सोडा आणि मीठ ८-१० वेळा चाळून घेणे.
  • दुध गरम करून त्यात लोणी घालणे.
  • केकच्या भांड्याला लोणी लवून त्यावर बटर पेपर लावणे व पुन्हा लोणी लावणे.
  • ओव्हन २००C वर गरम करणे.
  • अंड्याचे पांढरे आणि पिवळे वेगळे करणे.
  • अंड्याचे पांढरे घट्ट होईपर्यंत फेटून घेणे
  • अंड्याच्या पिवळ्यात पीठ साखर घालुन फेटणे
  • त्यात चालेले मैद्याचे मिश्रण व अंड्याचे पांढरे घालत एकत्र करणे.
  • त्यात अननसाचा इसेन्स घालुन मिश्रण एकत्र करणे.
  • त्यात दुध आणि लोण्याचे मिश्रण घालुन एकत्र करणे व केकच्या भांड्यात ओतणे.
  • केक मायक्रोवेव्ह आणि कन्व्हेक्शन मोड मध्ये १८०W आणि १८०C वर १५ मिनिट भाजणे व थंड करणे.
  • क्रीम फेटून घेणे. ते दुप्पट झाले की त्यात आईसिंग शुगर घालुन पुन्हा फेटणे.
  • केक आडवा मधोमध कापून त्यावर पाक पसरवणे.
  • अर्धे क्रीम खालच्या भागावर पसरवणे व त्यावर निम्मे अननसाचे तुकडे पसरवणे.
  • दुसरा केकचा भाग त्यावर ठेवून उरलेले क्रीम सर्व बाजूनी लावणे. वर अननस पसरवणे.

टीप
अंड्याचे पांढरे आणि दुध एकत्र करताना अलगद फेटणे.
केकला ओल्या टिश्यू किंवा फडक्यांनी झाकणे म्हणजे तो सुका होत नाही
अमूलच्या क्रीमनी मला फार मजा आली नव्हती त्यामुळे ह्या वेळी मी मिठाईच्या दुकानातून क्रीम आणले होते. हे जाडसर क्रीम डेअरीत मिळते.

मुळ्याचा पराठा


पहिल्यांदाच मुळी आणलेली. आम्हाला दोघांनाही फार काही ते आवडत नसल्यानी मी त्याची भाजी करण्याऎवजी पराठे केले

मुळ्याचा पराठा
साहित्य
२ मुळी
७ चमचाभरून गव्हाचे पीठ
३-४ हिरव्या मिरच्या
१ चमचा आले लसूण पेस्ट
चिमुटभर तिखट
१ चमचा धने पूड
मुठभर कोथिंबीर
मीठ
तेल
तूप

कृती
  • गव्हाच्या पिठात चमचाभर तेल घालुन पीठ मळणे व अर्धा तास भिजण्यासाठी ठेवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात आले लसूण पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, धने पूड, तिखट घालणे.
  • त्यात मुळी किसून घालणे व मिश्रण गुलाबी होईपर्यंत परतणे
  • त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालुन एकत्र करणे व त्याचे छोटे छोटे गोळे करणे.
  • मळलेल्या पीठाचे चपातीच्या आकाराचे गोळे करून ते पुरीच्या आकारात जाड लाटणे.
  • प्रत्येक लाटणीवर मुळीच्या मिश्रणाचा गोळा ठेवून तो सर्व बाजूनी बंद करणे व चौकोनी लाटणे.
  • तव्यावर पराठे तेल किंवा तूप सोडून गुलाबी रंगावर भाजणे.

टीप
मुळी परतताना थोडेसेच तेल वापरणे नाहीतर मिश्रण तेलकट होते
मी हे पराठे थोडे वेगळे दिसण्यासाठी म्हणून चौकोनी बनवले पण नेहमीच्या आलू पराठ्यासारखे गोल पण बनवता येतील.

आलू पराठा


जेंव्हा मला पटकन काहीतरी बनवायचे असते तेंव्हा मला पराठे बनवायला आवडते. अजॉयला ते फार आवडतात आणि मग भाजी नाही बनवली तरी चालते. काल घरात कुठलीच भाजी नसल्यानी मी शेवटी आलू पराठे बनवले

आलू पराठा
साहित्य
२ बटाटे
७ चमचा भरून गव्हाचे पीठ
१/४ चमचा लसूण पेस्ट
३-४ हिरव्या मिरच्या
चिमुटभर जीरा पूड
१ चमचा आमचूर पूड
मीठ
तेल
तूप

कृती
  • थोडेसे तेल गव्हाच्या पिठात घालुन पीठ मळणे व अर्धा तास भिजण्यासाठी ठेवणे
  • बटाटे उकडून त्यांची साले काढून किसणे.
  • मिक्सरमध्ये हिराव्या मिरच्या, लसूण पेस्ट एकत्र वाटणे.
  • किसलेल्या बटाट्यात वाटण, आमचूर पूड, जीरा पूड, मीठ घालुन मळणे व त्याचे छोटे छोटे गोळे करणे.
  • चपातीच्या पीठाचे गोळे करून दाबून वाटीचा आकार देणे. त्यात बटाट्याचा गोळा ठेवून चपातीचे पीठ बंद करणे.
  • पराठे अलगद लाटून तव्यावर गुलाबी रंगावर तेल/तूप सोडून भाजणे.

टीप
बटाटे किसताना त्याला किसणीला तेल लावले तर बटाटा किसणीला चिकटत नाही

दही वडा


जवळ जवळ ५ वर्षांपूर्वी मी एकदम पहिल्यांदाच घरापासून दूर बँगलोरमध्ये राहत होते. मी अमिता, विनया आणि अनुमेहा ह्यांच्या बरोबर राहत होते आणि साधारण २ महिन्यानंतर आम्ही ठरवले चला आज दही वडा बनवूया. आम्हाला काहीच स्वयंपाकाचा अनुभव नव्हता ना आमच्याकडे पुरेशी भांडी होती. आम्ही एम टी आरच्या वडा मिश्रणाचा वापर करून भांड्यातच वडे तळले. हे चालले असताना मी त्यांना खूप वेळा सांगितले की मला दही वडे चांगले कसे बनवायचे माहितीयेत :) अगदी लहान असतानापासून माझा एकदम आवडता पदार्थ असल्यानी आई कशी आणि काय काय करायची मी एकदम मन लावून बघायचे. इथे मी त्या शिकलेल्या सगळ्या माहितीसकट कृती देत आहे अर्थातच आता एम टी आरचे पाकीट वापरण्याचे दिवस गेले :)

दही वडा
साहित्य
१ वाटी उडीद डाळ
१ हिरवी मिरची
१/४ चमचा आले पेस्ट
१/२ लिटर दही
२-३ चमचा साखर
मीठ
तेल

कृती
  • उडीद डाळ रात्रभर पाण्यात भिजवणे.
  • सकाळी पाण्यातून उपसून त्यात हिरवी मिरची, लसूण पेस्ट घालुन बारीक वाटणे.
  • मिश्रण भांड्यात काढून त्यात मीठ घालुन चांगले घोटणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात छोटे छोटे वडे गुलाबी रंगावर तळणे.
  • वडे तळत असताना पाणी आणि मीठ एकत्र करून बाजूला ठेवणे/
  • एका खोलगट ताटात २-३ चमचे दही आणि वाटीभर पाणी एकत्र करून बाजूला ठेवणे.
  • वडा गुलाबी झाला की लगेच मिठाच्या पाण्यात घालणे व अजून वडे तळायला चालू करणे.
  • ते वडे तयार होत आले की मिठाच्या पाण्यातले वडे हातावर दाबून त्यातले पाणी काढून दह्याच्या ताटात ठेवणे.
  • असे करत सगळे वडे तळणे. मधून मधून ताटातले वडे उलटे करणे म्हणजे ते सर्व बाजूनी भिजतील.
  • दह्यात साखर, मीठ घालुन ढवळणे.
  • वडे खायला देताना वाटीत वडा घालुन त्यावर दही सोडणे.

टीप
वडा तळायला तेलात घातल्यावर तो तरंगायला पाहिजे, नाहीतर पीठ अजून घोटायला पाहिजे
वडा मिठाच्या पाण्यात घातल्यावर तिथे सुद्धा तो तरंगायला पाहिजे नाहीतर तो अर्धवट कच्छ असेल
वड्यावर आवडत असल्यास थोडे तिखट आणि चिंचेची चटणी पण घालता येईल

पालक पुरी


अजॉयला पालक बिलकुल आवडत नाही. त्यामुळे त्याला पालक खायला घालायच्या हिशोबानी मी ह्या पुऱ्या बनवल्या

पालक पुरी
साहित्य
१ पालक
२ हिरव्या मिरच्या
१/२ चमचा लसूण पेस्ट
१ चमचा जिरे
५ चमचा गव्हाचे पीठ
१ चमचा बेसन
मीठ
तेल

कृती
  • पालकाची पाने, हिरव्या मिरच्या आणि जिरे एकत्र पाणी घालुन बारीक वाटणे.
  • गव्हाचे पीठ, बेसन आणि मीठ एकत्र करणे व त्यात एक चमचा गरम तेल घालणे.
  • त्यात पालकाचे वाटण पिठात घालुन पीठ साधारण एक तास भिजवणे.
  • बारीक पुऱ्या लाटून तेलात तळणे.

टीप
पुऱ्या इतक्या चविष्ठ आहेत की त्याबरोबर भाजी वगैरेपण लागत नाही. एकदम सुंदर नाश्त्याचा प्रकार.

फणसाची भाजी


ह्या वेळी बाजारात कच्चा फणस मिळाला त्यामुळे मी त्याची भाजी करून बघितली

फणसाची भाजी
साहित्य
१ कच्चा फणस
४ चमचे शेंगदाणा कुट
१/२ नारळ
२ हिरव्या मिरच्या
१/२ चमचा तिखट
१/२ चमचा हळद
१ चमचा गुळ
१ चमचा म्हवरी
मीठ
तेल

कृती
  • फणसाची साल आणि आतील कडक जाड गर कापून टाकणे.
  • उरलेले गरे बियांसकट बारीक चिरणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात म्हवरीची फोडणी करणे
  • त्यात हळद, हिरव्या मिरच्या, चिरलेला फणस घालणे व ३-४ मिनिट परतणे.
  • साधारण २ वाटी पाणी घालुन फणस झाकण लावून शिजवणे. लागल्यास अजून थोडे थोडे पाणी घालत राहणे
  • भाजी शिजल्यावर त्यात गुळ, तिखट, मीठ, किसलेले खोबरे, शेंगदाणा कुट घालुन ढवळणे.

टीप
फणस कापताना हाताला आणि सुरीला तेल लावणे म्हणजे तो चिकटत नाही

सुरळीची वडी


मला सुरळीची वडी फार आवडते आणि मला नेहमी वाटायचे की ती करायला फार किचकट आणि अवघड आहे परंतु आता असे लक्षात आलेय की हि एकदम सोप्पी आणि पटकन होणारी कृती आहे


सुरळीची वडी
साहित्य
१ वाटी बेसन
१ चमचा मैदा
१ वाटी कोथिंबीर
१/२ नलर
१/२ चमचा आले पेस्ट
२-३ हिरव्या मिरच्या
१ चमचा हळद
१ चमचा म्हवरी
३/४ वाटी आंबट ताक
२ वाटी पाणी
मीठ
तेल

कृती
  • आले पेस्तम मिरच्या आणि मीठ थोडेसे पाणी घालुन बारीक वाटणे.
  • त्यात बेसन, मैदा, १/२ चमचा हळद, ताक आणि पाणी घालुन एकत्र करणे.
  • मिश्रण गाळून घेणे व कढईत सारखे ढवळत जाड होईपर्यंत शिजवणे.
  • ३ ताटल्याना तेलाचा हात लावून त्यावर ह्या मिश्रणाचा बारीक थर देणे.
  • कढईत २-३ चमचे तेल गरम करून त्यात म्हवरी घालुन फोडणी करणे व उरलेली हळद घालणे.
  • नारळ किसणे व कोथिंबीर बारीक चिरणे.
  • तिन्ही ताटांवर म्हवरी-हळद फोडणी, खोबरे आणि कोथिंबीर पसरवणे.
  • मिश्रणाच्या ५ उभ्या पट्ट्या कापणे व प्रत्येक पट्टी गुंडाळून वडी बनवणे. वरून उरलेले खोबरे, कोथिंबीर आणि फोडणी घालणे,

टीप
मिश्रण गाळल्यामुळे ते एकदम एकसंध होते आणि मिरची किंवा आल्याचे मोठे तुकडे त्यात येत नाहीत
आईनी मला कुकरमध्ये एक शिट्टी काढून मिश्रण शिजवता येईल असे सांगितलंय. मी ते जरूर पुढच्यावेळी करून बघणार आहे
मिश्रण ताटावर एकदम पटकन पसरवायला पाहिजे व एकदम पातळ पसरवायला पाहिजे. मी ह्यावेळी दोन ताटांवर पसरवलेले पण नन्तर ३ ताटांचा प्रयोग करणारे. सुरुवातीला थोडा जाड झाल्यास हरकत नाही हळू हळू पातळ बनवता येईल

पाणी पुरी आणि सुकी पुरी


बंगलोरमध्ये राहत असताना सी एम एच रोडवर एम के अहेमदच्या जवळ एक पाणी पुरीवाला बसायचा त्याची पुरी सगळ्यात भारी होती. नेहमी मला त्याच्या सारखी पाणी पुरी बनवायची इच्छा होती. मागच्या आठवड्यात मी करून बघितली आणि एकदम तशीच झालेली. तो शेवटी एक सुकी पुरी पण खायला द्यायचा त्याची पण कृती इथे देत आहे

पाणी पुरी

पाणी पुरी
साहित्य
२५ पुऱ्या
३ बटाटे
२.५ चमचा चाट मसाला
२.५ चमचा आमचूर पूड
१/२ चमचा + चिमुटभर जिरे पूड
१/२ चमचा + चिमुटभर धने पूड
चिमुटभर हिंग
१ चमचा कोथिंबीर
२ चमचा पुदिना
२ हिरव्या मिरच्या
१ लिंबू
६ वाटी पाणी
मीठ

कृती
  • बटाटे उकडून घेणे.
  • कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या, २ चमचे चाट मसाला, २ चमचे आमचूर पूड, १/२ चमचा जिरे पूड, १/२ चमचा धने पूड आणि हिंग पाण्याबरोबर वाटून घेणे.
  • मिश्रण गाळून त्यात लिंबाचा रस आणि मीठ घालणे.
  • बटाटे कुस्करून घेणे व त्यात उरलेली जिरे पूड, धने पूड, चाट मसाला आणि आमचूर पूड घालुन मळणे.
  • ३-४ पुऱ्या कुस्करून आणि ४ चमचे पुदिना पाणी मिश्रणात घालणे व एकत्र मळणे.
  • थोडे थोडे मिश्रण पुरीत घालुन त्यात बनवलेले पाणी घालुन खायला देणे.

टीप
ह्यात थोडीशी चिंचेची चटणी घालुन थोडी गोडसर चव पण आणता येईल

सुकी पुरी

Suka Puri
साहित्य
६ पुरी
२ टोमाटो
१/२ चमचा तिखट
१/२ लिंबू
चिमुटभर जिरे पूड
चिमुटभर धने पूड
चिमुटभर आमचूर पूड
मीठ

कृती

  • बटाटे उकडून कुस्करून घेणे
  • त्यात तिखट, जिरे पूड, धने पूड, आमचूर पूड आणि मीठ घालुन एकत्र करणे.
  • पुरीमध्ये हे मिश्रण घालुन त्यावर २ थेंब लिंबाचा रस पिळणे व खायला देणे

टीप
फक्त सुकी पुरी खायची असेल तर थोडा चाट मसाला पण घालता येईल पण आम्ही नेहमी पाणी पुरी नंतर खात असल्यानी थोड्या वेगळ्या चवीसाठी मी चाट मसाला वापरत नाही

वरयाचा भात आणि शेंगदाणा आमटी


लहान असताना आई हा भात आणि आमटी उपवासाच्या दिवशी बनवायची. मला हे इतके आवडते की मी उपवासाच्या दिवसाची वाट बघायचे. आज बरेच लोकांकडून कळले की शिवरात्री आहे मग मी लगेच हा भात आणि आमटी बनवली

वरयाचा भात

वरयाचा भात
साहित्य
१ वाटी वरया
२ वाटी पाणी
१/२ चमचा जीरा
२ चमचे तूप
मीठ

कृती
  • भांड्यात तूप गरम करून त्यात जीऱ्याची फोडणी करणे
  • वरया त्यात घालुन गुलाबी होई पर्यंत भाजणे.
  • पाणी आणि मीठ घालुन मध्यम आचेवर भात होईपर्यंत शिजवणे.

टीप
भात परतताना त्यात शेंगदाणा कुट पण घालता येईल थोडी वेगळी आणि छान चव येते आणि मग शेंगदाणा आमटीची गरज नाही पडणार पण मला ती आमटी आवडत असल्यानी मी शेंगदाणा कुट वापरला नाही

शेंगदाणा आमटी

शेंगदाणा आमटी
साहित्य
१ वाटी खोबरे
३ वाटी पाणी
२ चमचा गुळ
३-४ हिरव्या मिरच्या
३-४ कोकम
१/२ चमचा जिरे
मीठ
१ चमचा तूप

कृती

  • शेंगदाणे भाजून त्याची साले काढणे व मिक्सर मध्ये पाणी घालुन वाटणे
  • कढईत हे मिश्रण घालुन गरम करणे.
  • त्यात गुळ, बारीक चिरलेल्या मिरच्या, कोकम आणि मीठ घालुन उकळी आणणे.
  • छोट्या कढईत तूप गरम करून त्यात जीऱ्याची फोडणी करणे व उकळत्या आमटीत टाकणे.

टीप
शेंगदाणे एकदम बारीक वाटले पाहिजेत नाहीतर आमटी बरोबर होत नाही व सगळे शेंगदाणे खाली राहतील.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP